ओडिशा रेल्वे अपघाताला जबाबदार व्यक्तिंना कठोर शिक्षा केली जाईल, पंतप्रधानांची ग्वाही

जखमींच्या उपचारात कोणतीही कसूर केली जाणार नाही. अपघाताची सर्वंकष चौकशी कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Narenara Modi – ओडिशामध्ये बालासोर इथं झालेल्या रेल्वे अपघातातल्या मृतांची संख्या वाढून 288 झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दुपारी अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी रेल्वे सेवा सुरळीत कऱण्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीची त्यांनी माहिती घेतली. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश मुख्य सचिव आणि आरोग्य मंत्र्यांना दिले आहेत. त्यानंतर पंतप्रधानांनी बालासोर इथल्या फकीर मोहन वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले की, जखमींच्या उपचारात कोणतीही कसूर केली जाणार नाही. अपघाताची सर्वंकष चौकशी कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. रेल्वे विभाग सेवा सुरळीत करण्याच्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, या अपघातासंदर्भात काल सकाळी मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.