उत्कर्षाच्या गुगलीवर क्लिन बोल्ड झाला ऋतुराज, नेमकी कोण आहे सीएसकेच्या सलामीवीराची पत्नी?

महाबळेश्वर : आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवणारा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शनिवारी (०३ जून) विवाहबंधनात (Ruturaj Gaikwad Wedding) अडकला आहे. ऋतुराज गायकवाडने त्याची मैत्रीण उत्कर्षा पवार (utkarsha Pawar) हिच्याशी लग्न केले आहे. उत्कर्षा देखील एक क्रिकेटर आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. आयपीएल फायनल जिंकल्यानंतर ऋतुराजने पहिल्यांदाच त्याची पत्नी (Ruturaj Gaikwad Wife) उत्कर्षाला जगासमोर आणले होते. उत्कर्षासोबतच्या लग्नामुळे ऋतुराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकावे लागले. ऋतुराजने लग्नामुळे आपण फायनलसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयला दिली होती.

२४ वर्षीय उत्कर्षा मूळची पुण्याची राहणारी आहे. सुरुवातीला ती फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळायची पण वयाच्या ११व्या वर्षी तिने क्रिकेट स्वीकारले. यानंतर तिला महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली. याशिवाय उत्कर्षाने न्यूट्रिशन आणि फिटनेस सायन्सचा अभ्यास केला आहे.

उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती फलंदाजीसोबत मध्यमगती गोलंदाजीही करू शकते. उत्कर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती २०१२-१३ आणि २०१७-१८ च्या हंगामात महाराष्ट्राच्या अंडर-१९ संघाचा भाग होती. याशिवाय तिला पश्चिम विभागाच्या १९ वर्षांखालील संघातही खेळण्याची संधी मिळाली. यानंतर तिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघातही निवड झाली. उत्कर्षाने नोव्हेंबर २०२१मध्ये महाराष्ट्रासाठी शेवटचा सामना खेळला होता.

उत्कर्षा आणि ऋतुराज एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. दोघेही त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. ऋतुराजच्या एका मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेअरची बातमीही समोर आली असली तरी ती पूर्णपणे अफवा ठरली.