अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला उच्चांकी प्रतिक्विंटल १० हजार रूपये भाव

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी आत्तापर्यंतचा उच्चांकी म्हणजे क्विंटलला १० हजार ३५० रूपये भाव मिळाला आहे. गेल्या दहा वर्षातला हा उच्चांकी भाव आहे.

Akola – तूरडाळीच्या विक्रीदरामध्ये गेले अनेक दिवस वाढ होत असून, या वर्षी तुरीच्या दरवाढीनं उच्चांक गाठला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी आत्तापर्यंतचा उच्चांकी म्हणजे क्विंटलला १० हजार ३५० रूपये भाव मिळाला आहे. गेल्या दहा वर्षातला हा उच्चांकी भाव आहे.

देशांतर्गत तुरीचं उत्पन्न यंदा घटलं आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा फटका तुरीच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे एकीकडे भाववाढ तर दुसरीकडे मागणीत वाढ असूनही टंचाई जाणवत आहे. तुरीच्या दरात तेजी टिकून राहिल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, तूरडाळ आणि उडीद डाळी संदर्भात साठेबाजी आणि अवैध लिलाव रोखण्यासाठी तसंच या डाळी ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारनं एक आदेश जारी करत साठवणुकीवर मर्यादा आणली आहे. घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, साखळी विक्रेत्यांवर ही मर्यादा लागू करण्यात आली आहे. या आदेशान्वये ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे.