शेवटच्या घटकापर्यंत पोहचली ‘मन की बात’; मजूरांनी मोठ्या उत्साहाने ऐकले मोदींचे विचार

नाशिक- २०१५ सालापासून महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओवरून जनतेशी थेट संवाद साधत आहेत. या विशेष कार्यक्रमाच्या १००व्या भागाचे, ३० एप्रिल रोजी प्रसारण झाले. नेहमीप्रमाणे मन की बातच्या याही भागाला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, अगदी शेतात काम करत असलेल्या मजुरांनी देखील मन की बात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने ऐकला.

रविवारी (३० एप्रिल) देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधला. भाजप नेते प्रवीण अलई (Pravin Alai) हेदेखील नाशिक जिल्ह्यातील देवला तालुक्यातील लोहोनेर येथील त्यांच्या शेतात मोबाईलवर मन की बात ऐकत होते. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या शेतातील कांदा काढणी मजूरही सहभागी झाले. त्यांनी प्रवीण अलईंसोबत बसून मन की बात ऐकली.

या खास क्षणी प्रवीण अलईंनी सर्व मजूरांना बुंदीचे लाडू देत मन की बातच्या १००व्या भागाचा आनंदही साजरा केला. खुद्द प्रवीण अलई यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘पाऊस, वादळ, विजा असो… आपला नियोजित कार्यक्रम होणारच!’, अशा शब्दांत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत मन की बात पोहोचली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.