निकोलस पूरनसाठी दिल्ली अन् लखनऊ संघात चांगलीच रस्सीखेच, अखेर १६ कोटींसह या टीमने मारली बाजी

IPL Auction Live: आयपीएल २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. या लिलावात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्यावर मोठी बोली लागली. २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या पूरनला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने सामने आले. परिणामी त्याची बोली २ कोटींवरून १२ कोटींपर्यंत गेली. मग त्याला विकत घेण्याच्या स्पर्धेत लखनऊ सुपरजायंट्सची एन्ट्री झाली. अखेर लखनऊ आणि दिल्ली संघात रस्सीखेच झाल्यानंतर केएल राहुल याचा संघ पूरनला विकत घेण्यात यशस्वी ठरला. लखनऊने १६ कोटींच्या किंमतीसह पूरनला आपल्या ताफ्यात सामील केले.

दरम्यान या लिलावात सर्व १० फ्रँचायझींनी मिळून सुमारे ४०५ खेळाडूंवर बोली लावल्या. त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे होते. नेहमीप्रमाणे यंदाही लिलावात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. मिनी लिलाव असला तरीही, बऱ्याचशा खेळाडूंवर अनपेक्षित बोली लागल्या. त्यातही इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने सर्व विक्रम मोडले. त्याला विकत घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जपासून ते मुंबई इंडियन्सपर्यंत बऱ्याचशा संघांमध्ये जय्यत स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर १८.५० कोटींच्या विक्रमतोड बोलीसह पंबाज किंग्जने त्याला विकत घेतले आणि तो लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.