तुरुंगातील मंत्र्यांच्या सरकारला घाबरून, वेदांता-फाॅक्सकाॅन ने महाराष्ट्राचा नाद सोडला होता – प्रदीप पेशकार

Pune – वेदांता फाॅक्सकाॅन (Vedanta Foxconn)बहुचर्चित मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याची हाकाटी महाविकास आघाडीचे काहि नेते करीत आहेत. परंतू खरी गोम आहे ती जेल मधुन कारभार करणाऱ्या मंत्र्यांच्या सरकारला घाबरूनच वेदांता – फाॅक्सकाॅन ने महाराष्ट्राचा नाद सोडला होता असा आरोप भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष  प्रदीप पेशकार(BJP Udyog Aghadi State President Pradeep Peshkar)  यांनी केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात,  तत्कालीन उद्योग मंत्री  सुभाष देसाई (subhash desai)यांनीच त्यांच्या कार्यकाळात जागेचा प्रश्न असल्या असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याचे सुतोवाच केले होते. तरी पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने मा.उपमुख्यमंत्री देवेद्रजींनी प्रयत्नशील राहुन कंपनी अधिकारी यांच्याशी संवाद साधला व महाराष्ट्रात येण्याची विनंती केली , परंतु तो पर्यंत गुजरात सरकारने संपूर्ण पॅकेज सवलती देऊन प्रकल्प मंजूर केला. विशेष म्हणजे फक्त जागा हाच मुद्दा नसून सेमीकंडक्टर चिप उत्पादनासाठी मुबलक व विशिष्ट गुणधर्म असलेल्या पाण्याचीही आवश्यकता असते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली दिरंगाई आणि तीन्ही पक्षांच्या स्वयंघोषित नेत्याकडून होणारा विशेष “पाठपुरावा” आणि औद्योगिक महामंडळाची तत्कालीन “भूषणावह” कार्यपध्दती बघता वेदांताच्या अधिकारी मंडळींनी सर्व मोर्चा गुजरात कडे वळवला.

‘नाकाने कांदे सोलून’ भाजपा शिवसेना सरकारवर प्रकल्प घालवण्याची टीका करणाऱ्यांनी अडीच वर्षांत किती नवीन उद्योग प्रत्यक्षात आणले ते सांगावेत. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विभागाने महाराष्ट्रात किती कारखान्यांना क्लोजर नोटिस दिल्या व नंतर काय काय त्रास त्या कारखाना मालकांना झाला तेही जाहिर करावे.

एकदा वाटप केलेल्या औद्योगिक महामंडळाच्या भूखंडांना कितीतरी ठिकाणी उद्योजकाने कर्ज काढून पैसे भरल्यानंतरही वाटपाला स्थगिती दिली हेही सांगावे. असो बात निकली तो दूर तलक जाएगी,असे म्हणून आपण मात्र अशा प्रसंगात फक्त राजकारण न करता कंपनीची बाजूही समजून घ्यायला हवी.

अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करताना कोणताही उद्योग राजकीय स्थिरता,नेतृत्वावर विश्वास आणि गुंतवणूकीतून होणारा फायदा,उद्योग पुरक वातावरण,आदी गोष्टी विचारात घेऊनच निर्णय घेत असतो. आता पुन्हा एकदा विश्वास पूर्ण राजकीय नेतृत्वाच्या हातात महाराष्ट्राची सूत्रे असून आता लवकरच मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्चितच मोठ्या प्रकल्पांना महाराष्ट्रात आणण्याची बातमी मिळेल याची खात्री आहे. असे मत भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष  प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले.