अग्निपथ योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा, वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी…;आंबेडकरांचा आरोप

मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(Agneepath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे.

सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत. ही योजना रद्द करण्याची मागणी युवा आंदोलक करत आहेत. दुसरीकडे, विरोधी राजकीय पक्ष सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत .

दरम्यान, या योजनेवर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा टीका केली आहे. ते म्हणाले, अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल.असा दावा त्यांनी केला आहे.