4 वर्षे नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार? ‘अग्निपथ’वर कन्हैय्याचा सवाल

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(Agneepath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे.

सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत. ही योजना रद्द करण्याची मागणी युवा आंदोलक करत आहेत. दुसरीकडे, विरोधी राजकीय पक्ष सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि जुनी भरती पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत.

काँग्रेसचे बिहारमधील काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारनेही या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर निशाणा साधला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि या योजनेवर भाष्य केलं. ही योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तरुणांशी संवाद साधला का, विरोधी पक्षांशी चर्चा केली का, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे.

केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असे कन्हैय्याने म्हटले. युवकांना सरकारने 4 वर्षाचे लॉलिपॉप दाखवले आहे. पण, बिहारमधील बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. सैन्यात भरती नसेल तर येथील युवकांचे लग्न होत नाहीत. या योजनेनुसार एखादा तरुण 4 वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त होऊन 21 व्या वर्षी घरी येईल, तेव्हा लग्नासाठी त्याला मुलगी कोण देईल, त्याच्याशी लग्न कोण करेल?, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे. तसेच, काँग्रेसचा या योजनेला संपूर्णपणे विरोध असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे, सरकारने तात्काळ ही योजना मागे घ्यावी आणि नियमित भरती प्रक्रियेतूनच सैन्य भरती करावी, अशी मागणीही सरकारकडे केली आहे.