कर्णधार रोहित शर्माने केले सूर्यकुमार यादवचे कौतुक, तसेच सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  शानदार शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली. मात्र, असे असतानाही या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) इंग्लंडचे मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोन (David Malan and Liam Livingstone) यांची भागीदारी भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले. यासोबतच त्याने सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचेही खूप कौतुक केले.

रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्ही थोडे मागे पडलो तरी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा हा खूप चांगला प्रयत्न होता. या प्रयत्नाचा आम्हाला अभिमान आहे. आज सूर्यकुमारला पाहणे मनोरंजक होते. त्याला हे स्वरूप खरोखर आवडते. त्याच्याकडे अनेक प्रकारचे शॉट्स आहेत. जेव्हापासून तो आमच्या संघात सामील झाला आहे, तेव्हापासून तो दिवसेंदिवस मजबूत होत आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, इंग्लंडच्या भागीदारीने आम्हाला बॅकफूटवर ढकलले. टीम इंडियामध्ये सध्या सर्व काही ठीक आहे, असेही तो म्हणाला. पण आरामात बसायचं नाही. आम्हाला प्रत्येक खेळात स्वतःला सुधारावे लागेल. आजच्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले.

ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे झालेल्या T20I सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने डेव्हिड मलान (77) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (42) यांच्या शानदार खेळीमुळे 215 धावा केल्या . प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या वतीने सूर्यकुमार यादवने झुंज देत 117 धावांची धडाकेबाज खेळी खेळून भारताला 19 व्या षटकापर्यंत सामन्यात रोखले. तो आऊट होताच भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. भारतीय संघ हा सामना १७ धावांनी हरला.