करुणा मुंडे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक; आरोपी धनंजय मुंडेंच्या ओळखीचे असल्याचा दावा

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो. कंपनीचे संचालकही करतो, शिवाय आम्हीही तुमच्या पक्षात सामील होतो, असं सांगून आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असल्याने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवल्याचंही करुणा यांनी फिर्यादित म्हटलं आहे. मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भारत संभाजी भोसले (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष आभंग व प्रथमेश संतोष आभंग (दोघे रा.घुलेवाडी, ता. संगमनेर) या तिघांविरुद्ध फसवणूक केल्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा मुंडे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की, आरोपी भारत भोसले कामानिमित्त धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार येत होता. त्यावेळी त्याचा परिचय झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये आरोपी भारत, विद्या आभंग व प्रथमेश आभंग मुंबईला मुंडे यांच्या घरी आले होते. तेथे भोसले म्हणाला की, तुम्ही नवीन पक्ष काढत आहेत. त्या पक्षात आम्हा घ्या. आपण त्यासाठी खर्च विभागून करू. त्यांच्यावर विश्वास ठेवून मुंडे यांनी त्यांच्याशी पक्ष स्थापनेसंबंधी बोलणी सुरू ठेवली.

दरम्यान, काही दिवसांनी आरोपींनी त्यांची लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही कंपनी असल्याचे सांगून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव मुंडे यांना दिला. कंपनीत ३० लाख रुपये गुंतवले तर नफ्यापोटी दरमहा ४५ ते ७० हजार रुपये देऊ, असे आरोपींनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून मुंडे यांनी काही पैसे रोख तर काही चेकद्वारे दिले. मधल्या काळात आरोपींकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. पैसेही नाही आणि ते संपर्कही टाळत होते. शिवाय पैशाची मागणी केल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देत होते. शेवटी करुणा मुंडे यांनी संगमनेर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.