रम्य आठवणीत रमली मोतीबागेची दिमाखदार नूतन वास्तू…

Motibaug – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मोतीबागेची पुनर्विकसित चार मजली नवी वास्तू पाहण्यासाठी पुणे महानगरातील व पुण्याबाहेरील सुमारे बारा हजारांहून अधिक मान्यवर, नागरिक व स्वयंसेवकांनी आज मोतीबाग कार्यालयास भेट दिली व आपल्या रम्य व गौरवपूर्ण आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

निमित्त होते ते भारतीय संस्कृती संवर्धन संस्था म्हणजेच रा.स्व. संघ कार्यालय मोतीबागेच्या जुन्या इमारतीच्या बांधकाम विस्तार पूर्ततेनंतर सर्व स्वयंसेवक, देणगीदार, नागरिकांना ती पाहण्यासाठी सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने आज (रविवार, २६ नोव्हेंबर २३) सकाळी ९ पासून दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याची सुरवात भारतमाता व संविधान पूजनाने झाली.

यावेळी सकाळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह सचिन भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन बँक व आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर खरात, कश्यपदादा साळुंखे, प्रवीण कांबळे, दलित पँथरचे पुणे शहर अध्यक्ष बाबा गायकवाड, भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व संविधान पूजन करण्यात आले.

नव्या वास्तूत चार सभागृह, दोन अभिलेखागार, स्वागत कक्ष व दृक – श्राव्य संघ दर्शन कक्ष, वीस निवासी खोल्या, दहा बैठक कक्ष आहेत. शाखा व खेळ खेळण्यासाठी पोडियम मैदान व दुचाकी व चारचाकी तळघरात पार्किंग बनवण्यात आले असून पुणेरी परंपरा सांगणारी मेघडंबरी हे या इमारतीची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण इमारतीसाठी सोलर वीज निर्मिती संयत्र बसविण्यात आली आहेत.

मोतीबागेला भेट देणाऱ्या नागरिकांचा दिवसभर ओघ सुरूच होता. नुतनीकरण झालेल्या मोतीबागेला भेट देण्यासाठी आलेल्या सर्व स्वयंसेवक, देणगीदार नागरिकांनी भारतमातेचे व संविधानाची पूजन करीत आतमध्ये प्रवेश करत होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दीपावली उत्सवातील खास आकर्षण असेलले किल्ले रायगडाची प्रतिकृती प्रवेशव्दाराजवळ बनविण्यात आली होती.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विविध मजल्यांवर जावून जुन्या आठवणींना उजाळा देणारे ज्येष्ठ स्वयंसेवक व कुतुहलाने या रम्य आठवणी ऐकणारे तरूण स्वयंसेवकांनी मोतीबाग पाहण्यासाठी लक्षणीय संख्येने उपस्थिती लावली. उपस्थितांसाठी मोतीबाग पाहून झाल्यानंतर दीपावली फराळ व चहा- पानाची व्यवस्था करण्यात आली होती.

आज दिवसभरात मोतीबागेच्या पुनर्विकसित कार्यालयास भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, डॉ. अशोक कुकडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी देव, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदींचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा