‘शिवसेनेने महाविकास आघाडीप्रमाणेच संभाजी ब्रिगेड सोबत अभद्र युती केलेली आहे’

मुंबई – शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यातच आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाली, राज्यामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सोबत अभद्र युती केली होती, त्याच पद्धतीची ही संभाजी ब्रिगेड सोबत अभद्र युती केलेली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शंभर टक्के हिंदुत्ववादी शिवसेनेला यामुळे तिलांजली देण्यात आली आहे. या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.