तुमची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आधी लाऊडस्पीकर काढा; प्रवीण तोगडिया यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी उपस्थित केलेला  सध्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. एका बाजूला यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून भाजपचे कां टोचले आहेत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र चालवत असताना आपण असे पाऊल उचलले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते (राज ठाकरे) अचानक अशी मागणी का करत आहेत.असा सवाल त्यांनी केलाय.

भाजपवर हल्लाबोल करताना तोगडिया म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रात आंदोलन करत आहात पण मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि गुजरातमध्ये (Gujarat) लाऊडस्पीकर हटवत नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आधी लाऊडस्पीकर काढा. तोगडिया म्हणाले की, महाराष्ट्रातील मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी आम्ही दहा वर्षांपूर्वी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते उत्तर प्रदेशातही ही मागणी करत आहेत. मात्र सरकार त्यांचे ऐकत नाही.

माजी VHP अध्यक्ष म्हणाले की, भाजप ज्या राज्यांमध्ये सत्तेत नाही तेथेच अशी मागणी करत आहे. गैर-भाजप सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा हेतू आहे. संपूर्ण देशात ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. मग कुठूनही आवाज येणार नाही. ते म्हणाले की, अशा मुद्द्यांमुळे सरकारचे लक्ष दुसरीकडे वळते. त्यामुळे त्यांच्या कामावरही विपरीत परिणाम होतो. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळावे यासाठी भाजप जाणीवपूर्वक असे मुद्दे उपस्थित करत आहे.