जातीजातीत अंतर कसे वाढेल याची खबरदारी घेतली जाते,समाजात अंतर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे- पवार

पुणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित महागाई व बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा शुभारंभ  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP National President Sharad Pawar) यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.

या जागर कार्यक्रमातून तुम्ही गावोगावी जाऊन इथला शेतकरी कष्ट करतोय, उत्पादन वाढवतोय हे सांगणार आहात याचा आनंद आहे पण सामान्य माणसाच्या डोक्यावरील महागाईचे संकट या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे आहे. त्यामुळे जे आम्हाला महागाईत टाकतात त्यांना आम्हाला संधी द्यायची नाही अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

जातीजातीत अंतर कसे वाढेल याची खबरदारी घेतली जाते. काहीतरी प्रश्न काढून दोन समाजात विद्वेष कसा वाढेल याची काळजी घ्यायची. हे का तर त्यांनी जी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिली त्याची कोणतीही गोष्ट करण्याची अथवा कृतीत आणण्याची धमक यांच्यामध्ये नाही त्याचा परिणाम याबद्दल लोकांची नाराजी येऊ नये म्हणून लोकांना अन्य ठिकाणी लक्ष केंद्रीत करायला लावण्यासाठी कधी जातीचे, धर्माचे, भाषेचे नाव घेतात. यातून समाजात अंतर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

तुम्ही उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहात. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार तिथे जे घडतंय ते दुरुस्त करण्याची भूमिका प्रामाणिकपणे मांडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एखाद्या भगिनीला संधी दिल्यानंतर त्या संधीचे सोनं करण्याची कुवत ज्यांच्यामध्ये आहे त्यांची संख्या वाढेल कशी हे आपण बघूया. कर्तुत्व करण्याचा मक्ता केवळ पुरुषांसाठी नाही तर स्त्रियांना सुद्धा संधी द्या त्या तुम्हाला कर्तुत्व दाखवतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.