पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा आहे; बोर्डीकरांनी चाकणकरांना सुनावलं

 पुणे – वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री (Savitri of Satyavana) फार लवकर समजली, परंतु जोतिबाची सावित्री अजून समजली नाही, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, चाकणकर यांनी केलेल्या वटपौर्णिमेबाबतच्या वक्तव्यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर(BJP MLA Meghna Bordikar)  यांनी त्यांना सुनावलं आहे. वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे, असं ट्विट करत आमदार मेघना बोर्डीकर वट पोर्णिमेचं महत्त्व रुपाली चाकणकर यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय.

वटपोर्णिमेच्या सणाचा निसर्गाशी जोडले जाण्याचा उद्देश आहे, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरण्याचे कारण काय असावे? पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा राहिलेला आहे. तो सुरुच ठेवा. आमच्या धर्म, संस्कृतीचे त्यामुळे काहीच बिघडणार नाही , असंही बोर्डीकर म्हणाल्या आहेत.