शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव; कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं या ठरावात म्हटलं आहे.

दरम्यान, संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चं नेतृत्व आतापर्यंत काँग्रेसकडेच राहिलं आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी विविध जकीय पक्षांना एकत्र घेऊन यूपीएची स्थापना केली होती. सोनिया गांधी यांच्यानंतर यूपीएमध्ये शरद पवार हे वजनदार नाव मानलं जात आहे.