पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे; भाजपचा हल्लाबोल 

Mumbai – स्वतःच्या हट्टापाई मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर 20 हजार कोटी अतिरिक्त खर्च तसेच प्रकल्पाला विलंब करणा-या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे.

कांजूरमार्ग येथील 15 एकर जागा मेट्रो क्र.6 कारशेड देण्यात येत असलेल्या वृत्तावरुन आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड नेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आजची पत्रकार परिषद ही दिशाभूल करणारी होती.

मुळात महाविकास आघाडी सरकार असताना नेमण्यात आलेल्या शौनिक कमिटीने आरे कारशेड हिच जागा मेट्रो.3साठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता याचा विसर आदित्य ठाकरेंना पडलेला असावा. ज्या मेट्रो 6 चे कारशेड कांजूरमार्ग येथे होत असल्याच्या वृत्तावरुन त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ती मेट्रो लोखंडवाला ते कांजूरमार्ग अशी धावणार असून तिचा अंतिम स्थानक कांजूर मार्ग हेच आहे. या संदर्भात यापूर्वीच 15 एकर जागेसाठी केंद्र सरकारच्या विभागाकडे विनंती केली गेली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने तांत्रिकबाबी समजून न घेता अधिक जागा परस्पर एमएमआरडीएला देऊन टाकली.

मुळात मेट्रो.3 ही आठ डब्बे मेट्रो असून मेट्रो.6 ही सहा डब्ब्यांची मेट्रो आहे. त्याशिवाय मेट्रो.3 चे शेवटचे स्थानक सिप्झ आहे. तेथून आरे कारशेडच सोईचे ठिकाण आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या कारशेडवरती मेट्रो.3 थांबवणे, पुरेशा क्षमतेने वापर करणे हे शक्य नव्हते. आणि त्यामुळेच मेट्रो.3साठी कांजूरमार्ग हे व्यवहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. आरे येथे 800 एकर जंगल वाढवण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आणि त्यातही त्यांनी आरे कारशेडची जागा घेतली नव्हती. याबद्दलचे तांत्रिक अडचणी माहित असूनही आदित्य ठाकरे यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजच्या पत्रकार परिषदेतून केला.