अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यावरून भडकला गांगुली; बीसीसीआयला जाब विचारत म्हणाला…

वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India Tour Of West Indies) १२ ते २४ जुलैदरम्यान होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर एका वरिष्ठ खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. दरम्यान आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रहाणेला उपकर्णधारपद सोपवण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ज्यावेळी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यावेळी सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, ‘तुम्ही १८ महिने संघाबाहेर असता त्यानंतर एक कसोटी सामना खेळता. त्यानंतर तुम्हाला संघाचं उपकर्णधारपद दिलं जातं. मला या निर्णयामागचं कारण कळू शकलं नाहीये. भारतीय संघाकडे रविंद्र जडेजाचा पर्याय उपलब्ध होता. तो बऱ्याच वर्षांपासून संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र पुनरागमानंतर लगेचच उपकर्णधारपद देणं माझ्या समजण्या पलीकडचं आहे.