‘मातोश्री’वर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची होणार ‘ग्रेट भेट’? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पाडली. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याचे नंतर शरद पवार यांनी सांगितले. दिल्लीत ही घडामोड घडल्यानंतर आता राहुल गांधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र आदी विविध मुद्द्यांवर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या भेटीच्या (Rahul Gandhi Meeting With Uddhav Thackeray) निमित्ताने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.