राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारनं परवानगी नाकारली!

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेणार होते मात्र, काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनंच (Mahavikas Aghadi Government) राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली आहे.

राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद दिला गेला नाही आणि आता राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, ही नाचक्की झाल्यानंतर आता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप नाराज झाले आहेत. तसंच काँग्रेसकडून आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.   शिवाजी पार्कवर होणारी ही काँग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी 2003 आणि 2006 मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर 2018  मध्ये राहुल गांधींच्या सभेकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. मात्र, ती नाकारली गेली होती.