विधान परिषद निवडणुक : बावनकुळे यांनी मिळवला एकतर्फी विजय; छोटू भोयर यांना मिळाले केवळ एक मत 

नागपूर   – राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा अतिशय दारूण पराभव झाला आहे. नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदार संघातून भाजपचेच वसंत खंडेलवाल यांनी मोठा विजय मिळवला आहे.

विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली होती मात्र या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बाबनकुळे यांनी सर्वाना धोबीपछाड देत मोठा विजय मिळवला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे.  भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.