स्वबळावर लढायला तयार राहा; राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश

मुंबई : आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election) मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं समोर आलं आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले आहेत. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं कळतंय.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “निवडणुकीचं, सोशल मीडियाचं, निवडणुकीच्या दिवशीचं व्यवस्थापन कसं करायचं? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकाशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिली.