‘सेनेला दरवेळेस उत्तर प्रदेश निवडणूक लढवून डिपॉझिट घालण्यासाठी पैसे मिळतात’

मुंबई : आज पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत भाजप, काँगेससह देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने देखील उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील जास्त निवडणूक टप्प्यांवरूनही घणाघाती आरोप केले.

संजय राऊत यांच्या आरोपांना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी दरवेळेस डिपॉझिट घालण्यासाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते डिपॉझिट घालवतात, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी संविधान मानत नसले तरी आम्ही मानतो, विरोधकांना त्यांच्या सोयीनुसार झालं की मग योग्य वाटतं असेही ते म्हणाले तसेच संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतंय, अशी कोपरखिळीही त्यांनी लगावली आहे.