… म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची ईडीने केली सहा तास कसून चौकशी

चंडीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjeet Singh Channi) यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित वाळू उत्खनन प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात 6 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

59 वर्षीय काँग्रेस नेत्याने बुधवारी रात्री जालंधर येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयातून मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) निवेदन नोंदवल्यानंतर बाहेर पडले. वाळू उत्खनन प्रकरणी ईडीने काल त्यांना समन्स बजावले होते. याच प्रकरणात चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) उर्फ हनी याला पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी २० फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती.

३१ मार्च रोजी जालंधर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात त्याच्या आणि या प्रकरणात नाव असलेल्या इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. हनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने चन्नी यांना यापूर्वी अनेकदा समन्स बजावले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चन्नी यांचे हनी आणि इतरांशी असलेले संबंध आणि त्यांच्या पुतण्याने मुख्यमंत्री कार्यालयात केलेल्या काही भेटींबद्दल चौकशी केली. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अवैध वाळू उत्खनन कारवायांतर्गत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना केल्याच्या आरोपाबाबतही त्यांची चौकशी करण्यात आली.