आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत, परंतु… ; केतकीला राज ठाकरेंनी सुनावले खडेबोल

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Staion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (President of Maharashtra Navnirman Sena Raj Thackeray) केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट (Tweet) करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती (Mental disorders) आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

चांगल्याला चांगल आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवतानी आपल्याला शिकवल! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा. पोस्ट लिहिणाया व्यक्ती ह्या खरच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यामुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते. समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे, आता राज्यकर्त्यांनाही समजल असेलच. हे सगळ महाराष्ट्रात वेळीच आवरण गरजेच आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारन ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी राज यांनी केली आहे.