भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार; जयंत पाटलांच्या विधानावर संजय राऊत म्हणतात, “आधी सत्ता…”

मुंबई- २०२४ मध्ये महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे, असे विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले असून त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जयंत पाटलांच्या या विधानावर आपले मत मांडले आहे. त्यासाठी आपण आधी एकत्र बसू… मग सत्ता येईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल. या बैठकीनंतर नक्कीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, याबाबत काहीही दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणं, हाही महाविकास आघाडीचाच निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेतले जातील.

“पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल”, या जयंत पाटलांच्या दाव्याबाबत विचारलं असता राऊत पुढे म्हणाले, भाषणात आपण तसं बोलत असतो. त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलतील… काँग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले बोलतील आणि आमच्या मेळाव्यात आम्ही बोलू… पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र बसतो, तेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, अशी आमची भाषा असते, असे संजय राऊत म्हणाले.