‘रूप नगर के चीते’ १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात

Pune – काही गोष्टीचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री (Friendship) ही जीवाला जीव लावणारी असते, ती कधी हसवून जाते तर कधी डोळ्यात अलगद अश्रू देऊन जाते. दोन मित्रांमधील अशाच यारी दोस्तीची कथा सांगणारा ‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा मित्र लागतो. त्याचंही म्हणणं ऐकणं गरजेचं असतं, ‘तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का’? याच टॅगलाइनवर आधारलेल्या या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी  केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी (Vihan Suryavanshi) यांचे आहे.

अखिल आणि गिरीश या दोन जीवलग या मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. त्यांच्यातला दुरावा मिटणार की वाढणार? याची नक्कीच उत्सुकता लागणार आहे. यासोबतच मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्त्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा चित्रपट आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

अनेक जाहिराती, म्युझिक अल्बम, प्रिंट शूट मध्ये करण परब झळकला आहे तर कुणाल शुक्ल याने नाटयक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. मुग्धा चाफेकर,  हेमल इंगळे, आयुषी भावे आणि सना प्रभू या चौघींनीही मनोरंजन विश्वासोबतच सौंदर्यस्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटातही त्यांचा वेगळा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.

खरी मैत्री, म्हणजे आनंदाचा ठेवाच. पण या जिगरी दोस्तीत कधीकधी अनबनही होतेच. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून आम्ही हाच विषय रंजकपणे मांडला आहे. ‘मैत्री’ हा दोन अक्षरी शब्द, पण तो जपण्यासाठी माणसाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, हे दाखवणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी सांगतात.

‘रूप नगर के चीते’ Roop Nagar Ke Cheetey या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. गीते जय अत्रे यांची आहेत. सुप्रसिद्ध मल्याळम संगीतकार शान शान रहमान आणि मनन शाह यांनी संगीत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी मुजीब माजीद यांनी सांभाळली आहे. निर्मिती प्रमुख मालविका शाह आहेत. महावीर सबनवार यांनी साऊंड डिझायनिंगची तर प्रशांत बिडकर यांनी प्रोडक्शन डिझायनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा विहान सूर्यवंशी, सागर त्रिलोतकर यांची असून रंगभूषा महेश बराटे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन स्टेनली डी कोस्टा, विहान सूर्यवंशी, संतोष रेड्डी यांचे आहे. रोहन मापुस्कर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत.१६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.