वस्तीवरच्या क्लासरूममध्ये आमदारांची शाळा; यशोमती ठाकूर यांच्या भेटीने बदललं वातावरण

अमरावती  : शेंदोळा बु. येथे सुरू असलेल्या  वस्तीवरची क्लासरूम या शाळेला आज माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी भेट दिली. अचानकपणे झालेल्या आमदारांच्या भेटीने येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना थोडेसे दडपण आले, मात्र क्षणार्धात ॲड. यशोमती ठाकूर यांच्या आपुलकीच्या संवादामुळे येथील वातावरण या आनंदाने भरून निघाले.

तिवसा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर या शेंदोळा गावात आल्या होत्या. दरम्यान शेंदोळा बु. येथे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या वस्तीवरची क्लासरूम या शाळेस भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच तात्काळ त्या दिशेने मार्गक्रमण देखील केले.

शेंदोळा बु. या गावातील चंदन सावंत या सुशिक्षित तरुणाने कोणत्याही प्रकारे अनुदान नसताना स्वतः पदरमोड करून आपल्या गावातच एका खोलीत विद्यार्थ्यांसाठी  वस्तीवरची क्लासरूम ही शाळा सुरू केली आहे. आपल्या गावातील आणि परिसरातील पारधी, भराडी, बेलदार आदी भटक्या जमातीच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या उद्देशाने ही शाळा चालविली जाते.

आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी शाळेत पाऊल ठेवताच विद्यार्थी शांत झाले. मात्र त्यानंतर ठाकूर यांनी आपुलकीने मुलांना जवळ घेतल्याने मुले आनंदाने बागडू लागली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शिक्षक चंदन सावंत यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. सावंत यांच्या शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. सावंत यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच चांगला अभ्यास करा, आपल्या लागेल ते शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला.