शिवसेना, राष्ट्रवादी फुटली त्यात भाजपचा दोष काय? लग्न झालं, मुलगा होईना मग दोष शेजाऱ्याला का?

Ram Kulkarni‘s special article on NCP – Shivsena Conflict: महाराष्ट्राच्या वर्तमान राजकारणात दिड वर्षापुर्वी मुळची शिवसेना फुटली. तदनंतर शरदचंद्रजी पवार संस्थापक असलेल्या राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. मात्र राजकारणाचा भाग म्हणून पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जाणारे भाजपच्या नावाने ऊर बडवुन घेताना दिसतात. या फुटाफुटीच्या राजकारणात भाजपाचा दोष तिळाएवढा नाही. विस्तारवादी राजकारणात कुणी सोबत आले तर तो आदर्श लोकशाहीचा भागच म्हणावा लागेल. प्रश्न असा आहे लग्न झालं अनेक वर्षे संसार सुरू झाला. पण जेव्हा मुलंच होईना त्याचा दोष शेजाऱ्यावर कसा जावु शकतो? असंच काही स्पष्टपणे म्हटलं तर चुकीचं नाही. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. फोडाफोडीच्या राजकारणाला भाजप जबाबदार असं म्हणत अनेकांचा सुरू असलेला टाहो केविलवाणाच म्हणावा लागेल. प्रत्येक पक्ष नेतृत्वाने आत्मचिंतन केलं तर आपण कुठे कमी पडलो? दोष स्ाापडू शकतो. मग शेजाऱ्याला जबाबदार धरण्याची गरज नक्कीच वाटणार नाही.

आपला देश लोकशाहीचा पुरस्कर्ता असुन प्रत्येकाला आपलं मत, आपला पक्ष, आपला विचार चालवण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य घटनेनच मिळालेलं. राजकारणात अनेकदा आपआपल्या स्वअस्तित्वासाठी काही पुढारी स्वतंत्र पक्ष काढतात आणि जे पेरलं तेच उगवल्यानंतर त्याचा सामना करायला असमर्थ होतात तो भाग वेगळा. शरदचंद्र पवार राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये होते. तीन दशकापुर्वी त्यांनी स्वत:चा पक्ष काढला तर दुसरीकडे स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची केलेली स्थापना ज्यांचा विचार प्रखर हिंदुत्ववादाचा होता. भाजपा हा हिंदु रक्षण आणि राष्ट्रहिताच्या विचारधागेतुन पुढे आलेला पक्ष. मागे वळुन पहाताना पवारांचा राष्ट्रवादी ज्यांनी राष्ट्रीय पक्षाची साथ सोडली आणि स्वत:च्या राजकारणासाठी पक्षाची निर्मिती करून राष्ट्रवादीची स्थापना केली. एकेकाळी पुलोद माध्यमातुन देखील वर्चस्व दाखवले. मग वसंतदादा पाटलांच्या सोबत केलेली हातचलाखी असेल किंवा इतर गडबड.

बाळासाहेबांची शिवसेना आणि विचार वारसदार म्हणून पुत्र उद्धवजी ठाकरे काम करण्यासाठी पुढे आले. शिवसेना आणि भाजप यांची महायुती तब्बल बावीस वर्षे कारण उद्देश आणि दृष्टी एकच होता पण ती दृष्टी स्व.बाळासाहेब ठाकरेंच्याकडे असल्याने रूसवे-फुगवे झाले पण नाते टिकुन राहिले. उद्धवजीच्या हातात सुत्रे आल्यानंतर स्वअस्तित्वाचा त्यांनाही पाना फुटला. अनेकदा 2014 च्या लोकसभेपासुनच खऱ्या अर्थाने दात दाखवायला सुरूवात केली होती. पक्षाचा विचार आणि तत्व जेव्हा मतदारांच्या मनावर घट्ट झालेले असतात तेव्हा ती राजकिय ताकद कुणीच रोखु शकत नाही. 2019 ला राज्यातील मतदारांनी महायुतीला मजबुतीने निवडुन दिले. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाने शिवसेनेचं भलं झालं असं म्हणायला हरकत नाही. पण राज्याच्या राजकारणात उद्धवजी ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी बारामतीचा मळा गाठला. स्वमती समुद्रात फेकुन सत्तास्थानासाठी भाजपाला बाजुला केलं.

खरं तर हा मतदारांचा अपमानच म्हणावा लागेल. जो 19 ला जनादेश मिळवुन देखील शिवसेनेने केला. जास्त इतिहास सांगत बसण्यापेक्षा जैशी करणी वैशी भरणी उक्तीप्रमाणे अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवलं. गंमत बघा, कुठल्याही राजसत्तेत कंसाच्या रूपाने कुणी भुमिका घेत असेल किंवा शकुनी मामाच्या भुमिकेत कुणी असेल तर सत्तेवर बसलेले महामहिम धृतराष्ट्राच्या भुमिकेत काम करतात. तसंच काही शिवसेनेचे झालं. संजय उवाच म्हणत अडीच वर्षाचा कारभार ज्यासाठी हिंदुत्व अगदी समुद्रात फेकुन दिलं. मतासाठी लांगुनचालन करताना नको ते निर्णय घ्यावे लागले. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या इशारावर नाचावं लागलं.कारण महाविकास आघाडी त्यांच्या सहकार्याने स्थापना झाली.

हे सर्व करताना स्वत:च्या आमदाराला मुख्यमंत्री म्हणुन वेळ देता आला नाही. परिणामी वैतागुन स्फोट झाला आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने तब्बल 40 आमदार बाहेर पडले. या ठिकाणी प्रश्न असा पडतो की एखादा दुसरा आमदार बाहेर पडला तर आपण समजुन घेवु पण एकुण आमदारापैकी 90 टक्के आमदार बाहेर पडतात तेव्हा स्वत:चं आत्मचिंतन करण्याची गरज नक्कीच वाटते. राष्ट्रवादी पक्षाचं देखील तसंच म्हणावे लागेल. शरदचंद्रजी पवार यांचं मुरब्बी राजकारण देश अनुभवतेय. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक. एवढेच नव्हे तर राजकारणासाठी वाटेल त्या प्रयोगाचा सामना ते करतात. मागच्या अनेक वर्षापासून सत्तेत नसलेल्या पवारांना कुटुंब सांभाळता आलं नाही असा अंदाज आज निश्चित काढता येईल. स्वत: राजकिय फायद्याच्या भुमिका घ्यायच्या पण अनुयायांना हुकुमशाही पद्धतीने वागवायचं. हे आम्ही लेखणीत म्हणत नाहीत तर आज निवडणुक आयोगाच्या दालनात किंवा न्यायालयात वादे प्रतिवादे सुरू आहेत. त्यात त्यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला हा ठिपका अजितदादा गटाने ठेवला.

प्रसंगी मुख्यमंत्री पदाची संधी येवुन देखील अजितदादांना ही संधी नको पण भाजपसोबत जायला राष्ट्रवादीची तयारी. या भुमिकेत शरदचंद्र पवारांनी अनेकदा पक्षाचा चेहरा फिरवला. अर्थातच जे पेरलं तेच उगवतं. त्यांना अंतर्गत चढउतार शोधता आले नाहीत. परिणामी अजितदादा पवार भला मोठा गट घेवुन बाहेर पडले. 90 टक्यापेक्षा विधीमंडळातील बहुमत त्यांच्या बाजुने आलं. सर्वाधिक खासदार, आमदार, पदाधिकारी अजितदादासोबत एवढे सर्वश्रुत असताना मागच्या काही दिवसापासुन फोडाफोडीच्या राजकारणाला भाजप जबाबदार असा टाहो स्वत: उद्धवजी ठाकरे, खा.सुप्रियाताई सुळे अलीकडे त्यांचे लेकरं आदित्य असतील, रोहित असेल छाती ब्ादडत फोडताना दिसतात. कधी तरी लेकरांनी आपल्या बापाचं काय चुकलं?याचं आत्मचिंतन एक तर स्वत: करावा नाही तर बापालाच करायला लावावं. पण जणु काही हे सारं भाजपनचं फोडाफोडीचं राजकारण केलं अशा प्रकारचं खापर फोडत देशाच्या राजकारणात भाजपाला शिव्या घालण्याचं उद्योग असल्याचं लक्षात येतं.

एक तर शरदचंद्र पवाराचं संपुर्ण आयुष्य फोडाफोडीच्या राजकारणातचं गेलेलं असुन राज्यात असा एकही जिल्हा नाही ज्या जिल्ह्यात पवारांनी प्रस्थापित असतील किंवा चांगले घराणे असतील त्यांच्यात भांडणे लावली नाहीत. अनेक उदाहरणे राज्याच्या राजकारणात कुटुंबातील देता येतील. एक गोष्ट खरी आहे की 2014 ला देशाच्या राजकारणात झालेले राजकिय परिवर्तन त्यातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय पुन्हा 2019 ला बहुमताने मिळालेली संधी आणि मग भाजपाने घेतलेली उडी ही आता कुणी रोखु शकत नाही.लोकशाहीमध्ये पक्ष सत्तास्थानी कोणताही असो तो विस्तारवादाच्या भुमिकेतच काम करतो. भाजपा त्याला अपवाद नाही.

मागच्या काही वर्षापासुन भाजपाने देखील विस्तारवादाला प्राधान्य देताना ज्यांना आमची भुमिका मान्य आहे, ज्यांना राष्ट्रहित आणि गरिबाचं कल्याण अर्थात सबका साथ-सबका विकास हे तत्व मान्य त्यांना आले तर आमच्यासोबत घेण्याचं काम सुरू केलेलं ज्या प्रवाहात केवळ राज्यात नव्हे तर देशाच्या राजकारणात अनेक मातब्बर नेते जोडले. अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे वर्तमान राजकिय व्यवस्थेत त्यांचं अजिंडा घेवुन सत्तास्थानात काम करताना दिसतात. दोन्हीही नेते मजबुत आणि सक्षम असुन कुठं तरी त्यांच्यापुर्वीच्या नेतृत्वानेच आत्मचिंतन करण्याची गरज वाटते.हे सारं पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चित सांगावी वाटते की लग्न झालं, दोन-चार वर्षे होवुन गेली. एव्हाना बारा वर्षे झाली तरीही संतती प्राप्त होईना. मग अशा वेळी शेजाऱ्याचा दोष काय असु शकतो? किंवा त्यांच्या नावाने ओरड कशामुळे करायची? असाच प्रकार राज्याच्या वर्तमान राजकारणात सद्या सुरू असुन गट फुटाफुटीच्या राजकारणाचं खापर भाजपावर फोडणं म्हणजेच शेजाऱ्यावर दोष ठेवण्यासारखंच म्हणावे लागेल.

– राम कुलकर्णी ( भाजप राज्य प्रवक्ता)

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया