Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. 1 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर समाजवादी परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मुलगा अखिलेश यादव, भाऊ शिवपाल यादव आणि सून अपर्णा यादव दिल्लीला रवाना झाले होते.

55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. 1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

मुलायमसिंग यादव यांची राजकीय कारकीर्द अतिशय गौरवशाली आहे. 1977 मध्ये ते जनता पक्षाकडून पहिल्यांदा यूपीचे मंत्री झाले, तर 1989 मध्ये ते पहिल्यांदा यूपीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1993 आणि त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. मुलायम सिंह यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि 1993 मध्ये बसपासोबत सरकार स्थापन केले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पक्षाच्या संरक्षकाची जबाबदारी पार पाडत होते. मुलायमसिंह यादव सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.