‘डबल ढोलकीचं राजकारण प्रवक्त्यांच्या अंगलट येवु शकतं, हे राऊतांच्या भुमिकेतुन सार्‍या महाराष्ट्रानं पाहिलं’

राम कुलकर्णी – मागच्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांनी एकत्रित येवुन मुंबईत मोर्चा काढला. निमित्त राज्यपाल राजीनामा आणि महापुरूषांचा अपमान केल्याचं असलं तरी ठाकरे शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवुन केलेले शक्तिप्रदर्शन. वास्तविक पहाता पाहिजे तेवढा प्रतिसाद मोर्चाला मिळाला नाही. म्हणूनच की काय ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊतांनी नॅनो मोर्चा नव्हता सांगताना एक भव्य रॅलीचा फोटो ट्वीट केला जो की काही वर्षापुर्वी मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या मूक मोर्चाचा होता.

दुसर्‍या बाजुने भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी त्या मोर्चात किरायाने माणसं जमा केली, त्याचे पैसे वाटताना शुट केलेला व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली. एवढेच नाही तर ज्यांच्या ट्वीटची दखल महाविकास आघाडीच्या प्रमुखांना घ्यावी लागली. दोन पक्षाचे दोन प्रवक्ते पैकी एक खोटं बोलतो पण रेटुन हे लोकांनी पाहिलं तर दुसरा प्रवक्ता वास्तव चित्रण करून लोकांच्या समोर आणतो हे देखील जनतेने पाहिलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे पक्षाची भुमिका मांडणारं तोंड जेव्हा खोटं बोलतो ते लोकांना आवडत नाही आणि सत्य बोलणं हे जनतेच्या मनात रूजल्याशिवाय रहात नाही. संजय राऊतांनी केलेली रिकामी उठाठेव अंगलट आली नव्हे राज्यभर मराठा क्रांती मोर्चाने निषेध सुरू केला तर दुसर्‍या बाजुने केशव उपाध्येचं पक्ष संघटनेत कौतुक होवु लागलं. सत्यवादी क्रियामान, कियाशीलता जबाबदारीची जाणिव कशी असते? यातुन हे शिकण्यासारखं म्हणावे लागेल.

राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना तोलुन मालुन बोलावं लागतं. एक शब्द चुकला तरी त्याचे परिणाम पक्ष आणि नेतृत्वाला भोगावे लागतात. म्हणुन कदाचित तोंडाळ प्रवक्ते अनेक पक्षात अनुभवावरून बाजुला केले जातात. प्रवक्त्यांना प्रसिद्धीचे वेड लागल्यानंतर त्याच्या हातुन कशा चुका होतात? हे देखील लोकांच्या समोर आलं. मागच्या आठवड्यात महाविकास आघाडीने एकत्रित येवुन मुंबईत काढलेला मोर्चा तसं पाहता फेल गेलाच म्हणावा लागेल. पण ठाकरे शिवसेनेला महानगरपालिकेच्या तोंडावर दुभंगलेली शिवसेना ताकतीने कशी पुढे येते? हे दाखवणं क्रमप्राप्त आहेच. त्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला का? तर निश्चितच नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोर्चाचा उल्लेख नॅनो करणं साहजिकच. कारण ते गृहमंत्री आहेत. किती संख्या उपस्थित होती? ही आकडेवारी निश्चित त्यांच्याकडे असेल. मोर्चा यशस्वी झाला नाही याची जाणिव महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्ष प्रमुखाला देखील अवलोकनार्थ झालीच होती.

शिवसेना नेते संजय राऊतांनी मोर्चाचा उल्लेख मोठा ठासुन सांगताना वेगवेगळे वर्णन केले. पण त्याहुन कडी म्हणजे काही वर्षापुर्वी मराठा क्रांती मोर्चाने त्यांच्या मागणीसाठी भव्य मुक मोर्चे काढले. मुंबईत ज्या मोर्चाचा इतिहास कुणीच रेकॉर्ड मोडु शकत नाही एवढे भव्य दिव्य होते. त्यातली शक्कल लढवताना राऊत यांनी चक्क मराठा क्रांती मोर्चाचा एक फोटो ज्याचा संबंध कालच्या महामोर्चाशी लावला आणि हा विशाल जनसागर उपस्थित होता हे एका ट्विटद्वारे त्या मोर्चाचा फोटो संदर्भ म्हणुन जाहिर केला. खरं तर खोटं बोलण्याची सीमा असते पण राजकारणात असे काही नेते असतात ज्यांना खोटं बोलल्याशिवाय राजकारण जमत नाही त्याहुन अधिक रेटुन बोलणं हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. पण अनेकदा खोटे बोलण्याच्या अडचणी स्वत:साठी घातक सुद्धा ठरतात. कारण पक्षाच्या जबाबदार प्रमुखाकडे समाज तीक्ष्ण नजरेने पहात असतो. त्यातच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तो मोर्चा संपल्यानंतर किरायाने आणलेल्या युवकांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवुन दिली होती. अर्थात उपाध्ये यांच्या कृतीमध्ये सत्यपणाची चाहुल होती. कारण तो व्हिडिओ चक्क मोर्चाचाच होता. म्हणून कदाचित विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी त्या व्हिडिओची चौकशी करावी अशी जाहिर मागणी केली.

एव्हाना सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपाध्ये यांनी पितळ उघडं केलं म्हणुन धांदल धक्का बसला असावा. गंमत बघा, एक प्रवक्ता खोटं बोलतो. दुसरा प्रवक्ता सत्यपणाची कहाणी सांगतो. खोटं यासाठी संजय राऊतांनी ट्विट केलेला फोटो मराठा क्रांती मोर्चाचा होता हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांची कृती कुठल्या राजकिय स्तराला जावु शकते म्हणुनच निषेधासाठी ठिकठिकाणी राज्यभरात समन्वयक रस्त्यावर उतरले. त्यांच्या विरोधात सर्वत्र नाराजीचा सुर बोलला जातो. ज्या मराठा मुक मोर्चाने लोकशाही मार्गाने आंदोलन कसे करावे? हा आदर्श जगभर लोकशाहीच्या मंदिरात दाखवुन दिला. पण अशा प्रकारे गैरवापर राजकारणी लोक करीत असतील तर संताप येणं साहजिकच. कालांतराने आपण रिकामी उठाठेव केली याची प्रचिती राऊतांच्या मनाला पटलीच असेल. कदाचित मातोश्रीहुन त्यांना फोनही गेले असतील. कारण त्या ट्विटवर पुन्हा राऊत बोलले नाहीत पण राजकारणात एकदा फटफजिती झाली आणि आपल्या तोंडाळ भाषेला कुणीतरी ब्रेक लावु शकतं. हे देखील सिद्ध झालं.

प्रवक्त्याची भुमिका पक्षाची बाजु मांडणं, ध्येयधोरणे लोकांच्या समोर सांगणं, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते असतील तर राबवलेल्या योजना जनतेला सांगणं, माध्यमांशी संवाद करणं हे काम त्यांचं असतं. पण अलीकडे प्रवक्ते देखील उठसुठ तथ्यहीन आरोप जास्त करू लागल्याने त्यांच्याच भुमिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. संजय राऊत माध्यमासमोर आले की लोक आता टिव्ही बंद करू लागले. ही अतिशयोक्ती नाही सत्य पण आहे. बाकी काही असलं तरी राऊतांना रिकामी उठाठेव अंगलट आली. दुसर्‍या बाजुने उपाध्येयांना संघटनात्मक शाबासकी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. नागपुर अधिवेशनात एक दिवस केशव यांच्या नावाने चर्चेला गेला हे देखील कमी नाही. समयसुचकता, अभ्यासपुर्ण शब्दकोशातील ज्ञान, या सार्‍या गोष्टीची परिपक्वता प्रवक्ता म्हणुन जबाबदारी सांभाळणार्‍या माणसाकडे असणं महत्वाचे असतं. मात्र राजकारणात एकदा नशा चढली आणि पदावर असणार्‍याची अंगी मीपणा वाढला तर मग ती नशा त्याच्या कर्तृत्वाला रसातळालासुद्धा घेवुन जावु शकते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला यश कमी मिळालं तेव्हा संजय राऊतांची प्रतिक्रिया कमी यशाची कबुली म्हणुन आली असती तर कदाचित लोकांनी स्वागत केलं असतं. पण यश लपवताना राऊत म्हणतात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्ष नसतो ही प्रतिक्रिया जनतेला कशी आवडणार? चांगलं यश मिळालं की पक्ष आणि मग यश नाही मिळालं की पक्ष नाही. डबल ढोलकीचं राजकारण प्रवक्त्यांच्या अंगलट येवु शकतं. हे राऊतांच्या भुमिकेतुन सार्‍या महाराष्ट्रानं पाहिलं. केशव उपाध्ये बोलायचे म्हणुन कधी बोलत नाहीत. अगदी विरोधी पक्षात असताना देखील सत्य वचन मंमं मुखी म्हणुन त्यांच्या कुठल्याही आरोपावर आतापर्यंत गदारोळ उठलेला नाही तर राऊत कधी काय बोलतील?, कुणावर कशाचा आरोप करतील?, माध्यमांसमोर संस्कृती सोडून शिवराळ भाषेचा वापर केल्याशिवाय रहाणार नाहीत, प्रसंगी अनेकदा त्यांनी केलेले असल्याचे जनतेने पाहिलं. त्यामुळेच लक्ष्मण रेषा स्वत:च्या जबाबदारीला घालुन प्रवक्त्यांनी काम केलं तर पक्ष हित तथा नेतृत्व हित साध्य झाल्याशिवाय रहात नाही. अलीकडे अशा क्लृप्त्या, कटकारस्थान राऊतांच्या करवी नेहमीच घडल्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत करण्यात त्यांचाच वाटा असा आरोप आता जनता देखील करताना दिसते. बाकी काही असलं तरी एक ट्विट अंगलट आलं तर एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली.