‘भाजपा कधीच आमदार, खासदार चोरत नाही, इतर पक्षातील पुढार्‍यांचे पाय कमळाच्या दिशेने वळतात’

राम कुलकर्णी – भारतीय जनता पक्ष (BJP) राष्ट्रीय तर आहेच पण खडतर संघर्ष, अहोरात्र मेहनत, त्यागातुन आलेले योगदान, वैचारिक आणि सुसंस्कृत राजकीय माध्यमातुन समाजकारण ज्या पक्षाने उभं केलं त्या पक्षाला लोकांचा खंबीर पाठिंबा वर्तमान राजकिय परिस्थितीत देशाच्या कानाकोपर्‍यातुन मिळतो आहे. भाजपा सर्वसामान्य लोकांचा पक्ष म्हणुन पुढे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखं (PM Narendra Modi) नेतृत्व ज्याने लोकप्रियतेचे शिखर गाठलं. देशाच्या राजकारणात पिढ्यानपिढ्या मक्तेदारीचं राजकारण करत ज्या काँग्रेसनं इतर पक्षांना पुढे येवु दिलं नाही त्या काँग्रेसची अवस्था आज पाताळात गेल्यासारखी म्हणावी लागेल. हा पक्ष कधीच आमदार, खासदार चोरत नाही लोकांची मने जिंकल्यानंतर आपोआप इतर पक्षातील पुढार्‍यांचे पाय कमळाच्या दिशेने वळतात. ज्या शिवसेनेला मोठं करण्यात भाजप कधीच मागे राहिली नाही ती शिवसेना (Shiv Sena) आहे का विश्वासघातकी सेना?हा प्रश्न आता सामान्य मतदारांसह जनतेला पडला आहे.

वैचारिक आचार विचार किंवा सुसंस्कृत राजकारणाचा ताळमेळ नसलेल्या शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जनाधार देवुनसुद्धा केवळ सत्ता मोहापोटी भाजपचा विश्वासघात करत बारामतीचा मळा गाठला. हिंदुत्व (Hinduism)  विचारसरणीला मुठमाती देवून सोनिया मॅडमचं पुरोगामीत्व पत्कारलं. सत्तेच्या खेळासाठी भाजप राजकारण कधीच करत नाही. पण उद्धव ठाकरेचं (Uddhav Thackeray) राजकारण केवळ सत्ता पदासाठी हेही महाराष्ट्रानं पाहिलं. विश्वासघात कसा आणि कधी कुणी केला? हे उघड्या डोळ्यांनी लोकांनी पाहिलं. त्यांच्याच अंतर्गत आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची अनुमती आल्यानंतर घडलेलं महाभारत याचि देही, याचि डोळा जनता पहात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कंत्राटी वाटत असले तरी कंत्राटी कामगार हे कितीही वर्षे काम करू शकतात. कारण त्यांच्यातली क्षमता सेवकांच्या भूमिकेत असते.

2019 विधानसभा निवडणुकीत मतदार बंधुंनी भाजपा-शिवसेना युतीला जनादेश दिला होता. खरं तर त्याचं पालन महायुतीतल्या घटक पक्षाने करणे महत्वाचे. पण केवळ मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना नेत्यांनी अडेलतट्टुची भुमिका घेत चक्क बारामती गाठली आणि अडीच वर्षे महाविकास आघाडी सोबत संसार केला. वास्तविक पाहता भाजप राज्यात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष शिवसेना (Shiv Sena) सोडुन गेल्यानंतर विरोधी पक्षात बसुन अडीच वर्षे लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम केलंं. एकीकडे मुख्यमंत्री त्यांचे काही मंत्री करोनासारख्या (Corona) संकटात घराच्या बाहेर पडले नाहीत.

वास्तविक पाहाता या संकटाकडे सामाजिक दायित्व भूमिका घेत पाहण्यापेक्षा जणुकाही मढ्यावरचं लोणी खाण्यासाठी आपण आलोत या आविर्भावात करोना संकटातही महाविकास आघाडी अर्थात नेतृत्व करणार्‍यांनी आर्थिक उलाढाली करत हात धुतले. त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. शिवाय आरोग्य यंत्रणा आणि लोकांचे जीव वाचवण्यात यश आले नाही. दुसर्‍या बाजुने भाजपाने मात्र तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली करोनासारख्या संकटात केलेली कामगिरी अवर्णनीय राहिली. भाजप सत्तेत असो अथवा नसो शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरू शकतो हे कोरोनासारख्या संकटात दाखवून दिलं. सेवाभाव मनी बाळगुन लोकांची केलेली सेवा महाराष्ट्रातील जनता कधीच विसरू शकत नाही.

राजकियदृष्ट्या बघायचं झालं तर भाजपाने महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. पण शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी (Congress, NCP) यांना सर्व काही आंदण दिल्यासारखं काम केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा वेशीला टांगुन महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने घेतलेली भूमिका त्याहून अधिक मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी इतर वर्गसमुहाचं केलेलं लांगुनचालन, राष्ट्रवादी पक्षाची मुस्कटदाबी सहन केली. मुख्यमंत्री शिवसेनेचा विकास निधी राष्ट्रवादीचा यात सेनेच्या आमदारांची मुस्कटदाबी झाली. परिणामी यातुनच एकनाथ शिंदे गटाचा जन्म झाला.

राज्यात अस्थिरता येवु नये आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व स्थिर सरकार आलं पाहिजे या भुमिकेत भाजप असताना काळाची गरज म्हणुन शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यातही भाजप पक्ष किती त्यागाचा हे दाखवताना मुख्यमंत्री पदही शिंदे गटाला दिलं. शिवसेनेला त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत. मग भाजपने पाठिंबा देवुन सरकार बनवलं. त्यात शिवसेनेचं पोट दुखण्याचं कारण नाही. सत्तेसाठी भाजप कधीच राजकारण करत नाही हे बिहारच्या (Bihar) घडामोडीतुन दिसुन आलं. उद्धव ठाकरे भाजपाला राष्ट्रीय पक्ष का चोर पक्ष असं म्हणत असले तरी जर या कृतीतुन सरकार बनवायचं असतं तर मग 2019 नंतरच्या जनादेशानंतर विश्वासघात होवुन शिवसेना फोडण्याचं काम भाजपनं केलं नाही आणि केलं असतं तर कदाचित त्याचवेळी एकनाथ शिंदे सारखे गळाला लागले असते. पण या भानगडीत हा पक्ष कधी पडत नाही. पण चालुन कुणी आलं तर मग जनहितासाठी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी भाजप कधीच मागे हाटत नाही.

अर्थात चोरटा पक्ष कोण? हेच खर्‍या अर्थाने उद्धव ठाकरेंना अद्याप ओळखता आले नाही. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कंत्राटी कामगारांप्रमाणे असल्याचे ठाकरे भाषेत त्यांनी सांगितलं असलं तरी कंत्राटी कामगार आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारा वर्ग आहे. परमानंटपेक्षा कंत्राटी माणसं इमानदार असतात हे तितकंच खरं. भविष्यात शिंदे-फडणवीस कंत्राटी कामगार वाटत असले तरी इथे कायम होवु शकतात हे मात्र नक्की. मुळात आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शिवसेनेने जो काळ सद्या मिळाला आहे त्यात आत्मक्लेष करणे काळाची गरज वाटते. कारण निश्चित आत्म स्वरूपाची प्रचिती ठाकरेंना आली तर बारामतीकरांच्या मांडीला मांडी लावण्याचा आपला निर्णय चुकला याची खात्री पटल्याशिवाय त्यांना रहाणार नाही. राज्यातील जनता हुशार आणि दुरदृष्टीची आहे. उद्धव ठाकरेंनी आपण दिलेल्या जनादेशाचा आदेश पाळला नाही. हा रागही लोकांच्या मनात भरलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाची भुमिका बाजुला ठेवली. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण आपल्यालाच गाडुन घेतलं याची सिद्धता निश्चित कळेल. एक दिवस तरी मातोश्रीत (Matoshree) बसुन आत्मक्लेष निश्चित करावा लागेल.

भाजपा आमदार, खासदार चोरणारा पक्ष नाही तर या देशात भांडवलशाही तथा घराणेशाहीचं राजकारण संपवुन सेवाभावी राजकारणाची नवी संस्कृती आणण्याचा केलेला प्रयत्न सत्यात उतरतो. म्हणुन भाजपाला आता मताच्या राजकारणाची भिती राहिली नाही. त्याचं कारण भाजपाचा मुळ हेतु आणि अंत:करण ज्यात मानवतावादी, कल्याणकारी प्रभावाची जादु दिसुन येते. मागच्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या तर 50 टक्के यश एकट्या भाजपाला मिळतं. याचा अर्थ आता केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात भाजपाचा विचार जावुन पोहोचला. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नेतृत्व आपल्यासाठी उद्धारकर्ते असल्याची खात्री पटली म्हणावी लागेल. शिवसेनेची अवस्था केविलवाणी झाली असुन नव्याने संसार थाटणे त्यांच्यासमोर आवाहन मोठे आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत लवकरच त्यांना आपल्या स्वार्थी राजकारणाची प्रचिती आल्याशिवाय रहाणार नाही. कारण मुंबईकरांनी महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटासह भाजप (BJP) नेतृत्वाच्या हाती सत्ता सुत्रे देण्याचा निर्णय जणु काही घेवुन टाकला असं राजकिय चित्र सद्या दिसुन येतं. उद्धव ठाकरे भाजपाला चोर ठरवत असले तरी एक बोट दुसरीकडे दाखवताना चार आपल्याकडे असतात लक्षात घेणे महत्वाचे वाटते