‘भाजपने माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतलेला निर्णय नैतिकदृष्ट्या आदर्श आणि स्वागतार्ह निर्णय’

मुंबई – आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East Bypoll Election) होत असलेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान वाढविणारा; नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

या निर्णयाला बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय ने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या नैतिक निर्णयबद्दल रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. विजयी ठरणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे.

आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले होते. त्यांच्या पत्नी ही पोटनिवडणूक लढत आहेत.एखाद्या आमदारांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल तर सहानुभूती आणि नैतिकदृष्ट्या विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याचा आदर्श निर्णय घेणे योग्य आहे.ही परंपरा महाराष्ट्रात पाळली जावी हीच अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय आठवले यांची निवडणूक जिंकण्याची तयारी झाली असताना नैतिकदृष्ट्या योग्य निंर्णय घेऊन भाजप उमेदवाराने निवडणुकीतुन माचार घेणे हा स्वागतार्ह निर्णय आहे असे रामदास आठवले म्हणाले.