५० खोक्यावरून रॅपरला अटक; राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवीगाळीचे समर्थन ? 

Rap Song : महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप साँग (Rap Song) राज मुंगासे (Raj Mungase) या रॅपरने तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता.याशिवाय अनेक अश्लील शब्द देखील वापरण्यात आले होते.  दरम्यान सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील (Ambarnat) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. मुंगासेला अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजचा हा व्हिडिओच ट्वीट करत त्याच्याविरोधातील पोलीस कारवाईचा निषेध केला आहे.

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं.आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. असं आव्हाड यांनी म्हटले आहे.त्यामुळे आव्हाड आणि त्यांच्या पक्ष या कथित गायकाने केलेल्या शिवीगाळीचे समर्थन करतोय का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.