आता होणार हवा… ख्वाडा, बबन नंतर भाऊचा ‘टीडीएम’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार!

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गावातील संस्कृती, गावचा रांगडेपणा, स्थानिक-सामाजिक प्रश्नांवर बोलणारे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधुनिकीकरणाच्या युगात गावाकडचे गावपण जपणारे चित्रपट आणणारा प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे पुन्हा एकदा अशाच एका चित्रपटासह आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. २८ एप्रिल रोजी भाऊचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होतोय.

भाऊरावांच्या (Bhaurao Karhade) या नव्या सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमातील अभिनेते-अभिनेत्री, सिनेमाची कथा याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सिनेरसिकांच्या मनात निर्माण झाली आहे. तुमच्या मनातील याच सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

तसं तर, लाखो सिनेरसिकांसाठी ‘टीडीएम’ हा मराठी सिनेमा पाहण्यासाठी भाऊराव कऱ्हाडे हे फक्त नावचं पुरेसं आहे. कारण भाऊच्या ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. गावपण, गावातील जीवन, शेतकऱ्याच्या समस्या, अशा जनसामान्यांच्या जवळच्या विषयांंना भाऊ रुपेरी पडद्यावर मांडतो. त्यामुळे अल्पावधीतच भाऊचा एक वेगळा आणि मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ‘टीडीएम’ या सिनेमातही भाऊने अस्सल रांगडा मराठी आशय मांडला आहे. नामशेष होत चाललेल्या पिंगळा या मराठी संस्कृतीशी संबंधित विषयावर ‘टीडीएम’ आधारित आहे.

या सिनेमाबद्दल अधिक माहिती सांगताना भाऊराव म्हणाले, “हा सिनेमा करताना मराठी संस्कृती कशी जपली जाईल? याचा विचार करुनच टीडीएमची निर्मिती केली आहे. शेतकऱ्याची एक समृद्ध परंपरा आहे की, त्याच्या दारी येणारा कोणताही पाहुणा रिकाम्या हाती जाऊ नये. ही जी देवाणघेवाण होती, हा जो गावगाडा होता यावर टीडीएम भाष्य करतो. तसेच जुन्या काळात शेतकऱ्याचे खळे असताना त्याच्या दारी अनेक भिक्षुक येत असत, पिंगळा जोशी, वासुदेव, बहुरूपी असो. यापैकीच एक नेहमी पहाटे येणारा, गुणगुणारा, लोकांना शुभशकुन सांगणारा, जेवढे देतील तेवढेच घेणारा, शिवरायांची महती सांगणारा, शंभु महादेवाची महती सांगणारा पिंगळा, त्याच्या संस्कृतीसह सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा जुना काळ आणि आता शेतकऱ्यांची व एकूणच लोकांची झालेली ससेहोलपड, लोकांचा शहरांकडे वाढणारा कल या सर्व विषयांवर सांगड घालणारा सिनेमा म्हणजे टीडीएम आहे.”

दरम्यान टीडीएमची निर्मिती आणि दिग्दर्शन खुद्द भाऊराव कऱ्हाडे यांनी केले आहे. तसेच सिनेमात नवे चेहरे पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने हे मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता पृथ्वीराज हा मुळचा शिरुरमधील रामलिंग गावचा असून तो पुण्यात ऑफिस बॉयचे काम करत असे. सिनेमात पृथ्वीराजच्या भूमिकेवरही प्रेक्षकांची विशेष नजर असेल.