आघाडीतून बाहेर पडायला तयार, 24 तासात महाराष्ट्रात या; संजय राऊत याचं बंडखोर आमदारांना आवाहन 

Mumbai – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने ४८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे ४१ आमदार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजकीय संकटाच्या काळात भाजप पुढील रणनीतीवर वेगाने काम करत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात नव्या समीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आघाडीतून बाहेर पडायला तयार, 24 तासात महाराष्ट्रात या,असं संजय राऊतांनी मोठं विधानकेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटानं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडीमध्ये संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

एका आमदाराच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या सध्या २८७ आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला (MVA) राज्यातील १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर विरोधकांकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106, आरएसपीचे 1, जेएसएसचे 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ३७ समर्थक आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ठाकरे सरकार अल्पमतात येईल. मात्र, एकनाथ शिंदे भाजपसोबत जातात की स्वबळावर गटबाजी करून वर्चस्व कायम ठेवतात , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.