हज यात्रेकरुंना अतिरिक्त शुक्लात सवलत मिळवून देण्यासाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांना लिहले थेट पत्र 

मुंबई  – हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकऱ्यांकडून हज कमिटीने प्रवासासाठी निर्धारित शुल्कावर नागपूर अथवा मुंबई विमानतळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तथापि नागपूर विमानतळाचा पर्याय स्वीकारणाऱ्या हज यात्रेकरूंकडून ६३ हजार रुपयांचे अतिरिक्त शुक्ल आकारण्यात येत आहे. त्यामुळे हज यात्रेकरुंवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडत आहे, तरी या अतिरिक्त शुल्कावर सवलत देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हज ही मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाची व पवित्र धार्मिक यात्रा असून या हज यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून जात असतात. सरकारकडून हज यात्रेकरूंना विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंना फॉर्म भरताना हज कमिटीने प्रवासासाठी निर्धारित शुल्कावर नागपूर व मुंबई विमानतळ हे दोन पर्याय दिले होते. त्यानुसार हजारो यात्रेकरूंनी फॉर्ममध्ये मुंबई व नागपूर हे दोन्ही पर्याय दिले होते. हज कमिटीकडून काही यात्रेकरूंना मुंबई तर काहींना नागपूर विमानतळाचा पर्याय देण्यात आला.

तथापि, नागपूर विमानतळाचा पर्याय दिलेल्या यात्रेकरुंकडून ६३ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. मुंबईपेक्षा नागपूर विमानतळ मिळालेल्या यात्रेकरूंना प्रवास शुल्कात ६३ हजार रुपये एवढी मोठी वाढ झाल्याने त्यांच्यापुढे अतिरिक्त रक्कम उभी करण्याची अडचण निर्माण झाली आहे. अनेक यात्रेकरूंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अतिरिक्त ६३ हजार रुपये उभे करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून नागपूर विमानतळाऐवजी त्यांना मुंबई विमानतळ देण्यात यावे किंवा ते शक्य नसेल तर अतिरिक्त शुल्कात सवलत देण्याची मागणी अजित पवार यांनी पत्रात केली आहे.