अभी तो असली लढाई मुंबई में होगी; फडणविसांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, या भव्य विजयानंतर आता भाजपचे पुढील टार्गेट महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिका असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत.

जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.