राजकारण माझं पहिलं प्रेम आहे… रितेश देशमुख राजकारणात उतरणार? खुद्द अभिनेत्यानेच सांगितलं

मुंबई- अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याला कुटुंबातून राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचे वडील विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तसेच रितेशचे दोन्ही भाऊ धीरज आणि अमित देशमुख हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत. परंतु रितेशने वेगळी वाट निवडली. मात्र राजकारण हे त्याचे पहिले प्रेम असल्याचे रितेशने सांगितले आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रितेशने याचा खुलासा (Ritesh Deshmukh On Politics) केला.

“राजकारण की सिनेसृष्टी, तुमचं पहिलं प्रेम कोणतं?” असा प्रश्न रितेशला मुलाखतीत विचारला गेला. यावर त्याने हटके उत्तर दिलं. “मी खरं सांगू का तर माझं पहिलं प्रेम राजकारण आहे. अर्थात मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. पण निश्चितपणे ते माझं पहिलं प्रेम आहे. कारण मी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात वाढलो आहे. आजूबाजूला काय घडतंय, याचं भान असतंच आणि त्यामुळे ते राजकारण कायम माझं पहिलं प्रेम आहे आणि असणार आहे. ते प्रेम पुर्ण व्हावं अशी इच्छा नव्हती. पण राजकारणाबद्दल प्रेम आणि आपुलकी हे कायमच असेल,” असं रितेश यावेळी म्हणाला.

राजकारणात जाणार का?
‘तुमचे दोन्ही बंधू अमित देशमुख, धीरज देशमुख राजकारणात सक्रीय आहेत. मग तुम्हाला तशी इच्छा आहे का?’ असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर रितेशने नकारार्थी उत्तर दिलं. तो म्हणाला, “अजिबात नाही. घराणेशाहीचा वाद आता यापुढे नको. माझं राजकारणाबद्दल जे काही स्वप्न आहे, ते मी चित्रपटात पात्राद्वारे पूर्ण करेल. तसंही ते फार सोप्प आहे. भविष्यात काय होईल, याची मला कल्पना नाही. मला अभिनेता व्हायचं होतं. मला ती संधी मिळाली आणि मी अभिनेता झालो. गेली २० वर्ष मी अभिनय क्षेत्रात काम करतोय. या काळात लोकांनी भरभरून प्रेम दिलं, म्हणून मी या क्षेत्रात अजून टिकून आहे. माझ्या कामावर माझं नितांत प्रेम आहे आणि मरेपर्यंत अभिनय करावं ही माझी इच्छा आहे.”