राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल ? रोहित पवार – निलेश लंकेंची लागणार वर्णी ?

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली असून आता खांदेपालट होण्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरुन शिवसेना नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. निधीवाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार उघडपणे जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार लक्ष्यवेधी ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यात महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता काही तरुण आमदारांची देखील वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. आमदार रोहित पवार (rohit pawar) आणि आमदार निलेश लंके(nilesh lanke) यांच्या नावांचा विचार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सोबतच महाविकास आघाडीला भाजपकडून खिंडीत पकडले जात असताना काही जुन्या जाणत्या नेत्यांना देखील मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते असे समजते. तर काही निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देखील दिला जाऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय  मंत्रिमंडळ विस्तारातून सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे.