महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत ? 

मुंबई: महापुरुषांवर बेताल वक्तव्य करत वादात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा आज सकाळी (१२ फेब्रुवारी) राष्ट्रपतींनी मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोण आहेत रमेश बैस?(Who exactly is the new governor of Maharashtra Ramesh Bais?)

रमेश बैस झारखंडचे 2021 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते. 1989 आणि 1996-2019 या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. बैस यांचा जन्म रायपूरचा. भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या बैस यांचं शालेय शिक्षण भोपाळ इथे झालं.

1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. रायपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग 6 वेळा याच मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून येत गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण ही अत्यंत महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.