विराटच्या कॅप्टन्सीखाली बेंगलोरचा पंजाबवर २४ धावांनी विजय; फाफ, सिराज विजयाचे शिल्पकार

मोहाली- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर आयपीएल २०२३चा २७ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकात ४ बाद १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबला १८.२ षटकात १५० धावाच करता आल्या आणि बेंगलोरने २४ धावांच्या फरकाने सामना जिंकला. हा बेंगलोरचा हंगामातील तिसरा विजय होता.

बेंगलोरच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरण सिंगने सर्वाधिक धावा केल्या. ३० चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ४६ धावा फटकावल्या. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक जितेश शर्मा यानेही २७ चेंडूत ४१ धावांची झटपट खेळी केली. या खेळीसाठी त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त पंजाबचे इतर खेळाडू विशेष खेळी करू शकले नाहीत.

या डावात बेगलोरकडून मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) चमकदार प्रदर्शन केले. आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये २१ धावा देत त्याने ४ विकेट्स काढल्या. वानिंदू हसरंगानेही २ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना प्रभारी कर्णधार आणि सलामीवीर विराट कोहलीने (Virat Kohli) ५९ धावा आणि फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plesis) ताबडतोब ८४ धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी झाली. या दोघांच्या खेळींच्या जोरावर बेंगलोरने १७४ धावा फलकावर लावल्या होत्या. या डावात पंजाबकडून हरप्रीत ब्रारने २ आणि अर्शदीप सिंग व नाथन एलिसने प्रत्येकी १ विकेट घेतली होती.