राक्षसी वृत्तीचं मुंडकं छाटल्याशिवाय मसनातील महाकाली शांत होणार नाही, रूपाली पाटलांची चंद्रकांत पाटलांवर टीका 

Pune – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले असताना ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं. तुम्ही खासदार आहात, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते कळत नाही? आता तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या,असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, या टीकेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते’, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. याशिवाय त्यांनी ‘बेताल ,सत्तापिपासू चंपा!’, असं म्हणत चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.