ठाकरेंसोबत पंगा घेणारी अभिनेत्री कंगना रनौत एकनाथ शिंदेंची भेट घेणार

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कट्टर विरोधक मानली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत (Actress Kangana Ranaut) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. कंगना आज रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांनाही आपल्या बाजूनं वळवण्याचा शिंदे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यामुळं कंगना रणौतच्या निकटवर्तियांकडून विचारणा झाल्यावर शिंदे यांनी तिला तातडीनं भेटीची वेळ दिली आहे. महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात कंगनानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वारंवार वादग्रस्त विधानं करून थेट शिवसेनेशी पंगा घेतला होता. तसंच कंगनाच्या कार्यालयातल्या बांधकामावरही मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती.

दरम्यान, कंगना रणौत ही एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. या भेटीत नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच कंगना राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.