“अभी पिक्चर बाकी है, परळीमधून नवरा विरुद्ध बायको ही लढत होणार”

पुणे : ‘‘सामाजिक न्यायमंत्री पती धनंजय मुंडे यांच्यासोबत आपले भांडण वेगळे आहे, अभी पिक्चर बाकी है. मी बऱ्याच यातना सहन केल्या असून, मला अद्याप न्याय मिळालेला नाही. जेव्हा माझे पती मला म्हणतील की मी हरलो तू जिंकली, तो माझ्यासाठी न्याय असेल,’’ असे मत शिवशक्ती सेना पक्षाच्या सर्वेसर्वा करुणा मुंडे यांनी व्यक्त केले.

करूणा मुंडे यांनी आगामी काळात परळीतून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. वेळ आली तर परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत होईल, असं म्हणत करूणा मुंडे यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

ही कुणाला काही बोलणार नाही, काही दिवस फडफडेल आणि घरात शांत बसून राहील असं त्यांना वाटलं असावं. परंतु देवाला काही वेगळेच मंजूर होते. मी आता माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं. मी खूप चांगलं करते अस देखील त्यांनी मला सांगितलं.

‘‘न्यायालयाच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही बोलणार नाही. न्यायालयाची स्थगिती उठेल त्यादिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेउन आपल्यावरील अन्याय जनतेला सांगू. महिलांवरील अन्यायाबाबत कोणीही आवाज उठवत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत, परंतु त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. तरच, शक्ती कायदा अस्तित्वात आला असे आपण समजू,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.