टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ आक्रमक फलंदाज दुखापतीमुळे झाला T20 मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली- लखनऊ येथे झालेला श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना भारताने ६२ धावांनी जिंकला. आता भारतीय संघ हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे होणारा दुसरा सामना जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ मालिकेवर कब्जा करेल. दुसरीकडे, श्रीलंका संघासाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल.

क्षेत्ररक्षण वगळता भारतीय संघ प्रत्येक विभागात मजबूत दिसत असताना दुखापतीमुळे भारतीय संघ त्रस्त झाला आहे. फलंदाज सूर्यकुमार यादव, गोलंदाज दीपक चहर नंतर आता फलंदाज ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, मयंक अग्रवालचा उर्वरित दोन T20 सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश केला आहे. मयंक धर्मशाला संघात सामील झाला आहे.

गुरुवारी लखनौमध्ये झालेल्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी त्याने उजव्या हाताच्या मनगटाच्या सांध्यामध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती.

एमआरआय स्कॅन नंतर तज्ञांच्या सल्ल्याने करण्यात आले. ऋतुराज आता त्याच्या दुखापतीच्या पुढील व्यवस्थापनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे जाणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 साठी भारताचा T20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, मयंक अग्रवाल