कंपन्यांमधील सर्व कामगारांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक – रविंद्र चव्हाण 

वसई – वसई मधील पाझर तलाव रोड येथील जूचंद्रपाडा येथे कॉस पॉवर कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचे वृत समजताच पालघरचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी तातडीने रात्री घटनास्थळी धाव घेतली व त्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ऑर्बिट रुग्णालयाला (Orbit Hospital) भेट देऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. जखमींवर तातडीने वैदयकीय उपचार करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच येणा-या काळात या परिसरातील कंपन्यांमधील सर्व कर्मचा-यांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक करण्यासाठी कंपन्यांचे मालक वा संचालक यांना आवश्यक निर्देश देण्यात येतील. त्याचप्रमाणे भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी सर्व योग्य उपाययोजना करण्याचे निर्देशही रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार कंपनीमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असताना हा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट होईल. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कंपन्यामधील कर्मचा-यांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक करणे आवश्यक आहे. तसेच अशा दुर्घटना भविष्यात घडुच नये त्यादृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

कॉस-मॉस कंपनीला लागलेल्या भीषण आगीची घटना ही खेदजनक आहे, परंतु येणा-या काळात अशी दुदैर्वी घटना घडू नयेत यासाठी ज्या कंपन्याचे जे कोणी मालक, संचालक असतील त्यांनी अशा दुर्घटना रोखण्याच्यासाठी सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे आहे. कामगारांना सुरक्षितताच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे, कामामध्ये तांत्रिक चुका टाळण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच जे नवीन कामगार कंत्राटी वा रोजंदारी स्वरुपात कंपन्यांमध्ये कामाला येतात त्यांनाही जुन्या कामगारांनाप्रमाणे सुरक्षितता प्रशिक्षण देण्याचे निर्देशही कंपन्यांच्या मालकांना देण्यात येतील. असेही रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कंपनीच्या मालकांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे सूतोवाच केले आहे. परंतु राज्य सरकार म्हणून या दुर्घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना जी काही शासकीय आर्थिक मदत असेल ती त्यांना देण्यात येईल, त्याप्रमाणे जखमींच्या उपचारासाठी लागणारी सर्व मदतही देण्यात येईल असे आश्वासनही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.