जबरा फॅन! आंध्र प्रदेशात चाहत्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे बांधले मंदिर, होतंय कौतुक

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नंतर आता आंध्र प्रदेशातील एका चाहत्याने समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu) मंदिर बांधले आहे. दक्षिण भारतातील चाहत्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या आवडत्या कलाकाराचे मंदिर (Samantha Ruth Prabhu Temple) नक्कीच बांधतात. नयनतारा, हंसिका मोटवानी आणि नमिता यांच्यानंतर आता समंथा रुथ प्रभू हिच्या नावाने मंदिर बांधले जात आहे.

नयनतारा, हंसिका आणि नमिता यांचे मंदिर तामिळनाडूमध्ये बांधले आहे. विशेष म्हणजे, समंथा रुथ प्रभू ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘पुष्पा’ मधील भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध झाली आहे. आता आंध्र प्रदेशातील बापटलाजवळील अल्लापाडू गावात तिचे मंदिर बांधले जात आहे. समंथा रुथ प्रभू हिची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी ठेवण्यात येणार आहे. तेनाली संदीप असे तिच्या फॅनचे नाव असून ते समंथाचे मंदिर बांधत आहेत. मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले असून २८ एप्रिल रोजी मंदिर अधिकृतपणे उघडण्यात येणार आहे.

आतापर्यंत या फॅनला समंथा रुथ प्रभूला भेटण्याची संधी मिळालेली नाही. फॅन म्हणतो की, तो केवळ समंथाच्या चित्रपटांनीच नव्हे तर तिने केलेल्या चॅरिटी कामांनीही तो प्रभावित झाला आहे. समंथा रुथ प्रभू प्रत्युषा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करते. आतापर्यंत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू किंवा तिच्या टीमकडून कोणतीही या मंदिराबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.