संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार 

पुणे – शिवशाहूंचा वंशज म्हणून सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी तसेच सर्वांना संघटित करण्यासाठी, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, शिव शाहूंचे नाव जगभरात नेण्यासाठी मी स्वराज्य नावाची नवीन संघटना घोषणा केली आहे. तसेच येणारी राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी आज केली.

संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद (Sambhaji Raje Press Conference in Pune) घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय भूमिका मांडतात? काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर पत्रकार परिषदेतून संभाजीराजे यांनी वरील दोन मोठ्या घोषणा (Sambhaji Raje announced two big decisions) केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावे. म्हणून 2016 ला मी पद स्वीकारल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्या दोघांचेही संभाजीराजेंनी यावेळी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांवर माझी पुढील वाटचाल असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले,  पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे. पण पहिला टप्प्यात संघटीत होणे गरजेचे आहे. या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.