राज्यसभा उमेदवारीबाबत वडील शाहू महाराजांच्या ‘त्या’ दाव्यानंतर संभाजीराजेंचं लक्ष्यवेधी ट्वीट!

कोल्हापूर –  संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केलेल्या दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

शाहू महाराज म्हणाले, छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं (BJP) दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं.

यासंदर्भात वडिलांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यावर सूचक शब्दांत ट्वीट (Tweet) केलं आहे.दरम्यान, यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झालेली असतानाच संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, असं संभाजीराजे छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.